Scorching heat: जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्याने बहरलेल्या खरीप पिकांना ऑगस्टमध्ये मात्र पावसाने मोठी हुलकावणी दिली आहे. गेल्या १५ दिवसांपासून पावसाने खंड दिल्याने फुलोऱ्यात आलेले सोयाबीन माना टाकू लागले आहे. ३१ ऑगस्टपर्यंत दमदार पाऊस झाला नाही, तर हातचे पीक जाण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकरी चिंतेत आहेत.

पंधरा दिवसांपासून पावसाची दडी; फुलोऱ्यातील सोयाबीन माना टाकू लागले
साखरखेर्डा : जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्याने बहरलेल्या खरीप पिकांना ऑगस्टमध्ये मात्र पावसाने मोठी हुलकावणी दिली आहे. गेल्या १५ दिवसांपासून पावसाने खंड दिल्याने फुलोऱ्यात आलेले सोयाबीन माना टाकू लागले आहे. ३१ ऑगस्टपर्यंत दमदार पाऊस झाला नाही, तर हातचे पीक जाण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकरी चिंतेत आहेत.
सिंदखेडराजा तालुक्यात सोयाबीनचा सर्वाधिक पेरा असून सुमारे ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली आहे. त्याखालोखाल २५ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. इतर पिकांचीही लागवड करण्यात आली आहे. हळदीची लागवड यशस्वी झाली असली, तरी सध्या पिकाला पाण्याची गरज भासत आहे. अनेक शेतकरी सोयाबीन पीक वाचविण्यासाठी स्प्रिंकलरचा वापर करीत आहेत. मात्र, सोयाबीनचे क्षेत्र मोठे असल्याने उपलब्ध पाण्यावर संपूर्ण क्षेत्राला पाणी देणे शक्य होत नसल्याचे चित्र आहे.
कोरडवाहू क्षेत्रातील सोयाबीनची अवस्था दयनीय झाली आहे. फुलांनी बहरलेले सोयाबीन दिसत असले, तरी फळधारणा होण्यासाठी पुरेसा ओलावा आवश्यक आहे. पाण्याअभावी फुले गळून पडत असल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. आधीच कीटकनाशकांच्या फवारणीवर हजारो रुपयांचा खर्च करून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच पावसाने दडी मारल्याने पीक घरात येईपर्यंत शेतकऱ्यांची चिंता कायम आहे.
तालुक्यातील सातही मंडळांत ११ ऑगस्ट रोजी पाऊस झाला होता. शेंदुर्जन मंडळात तब्बल ८९ मिमी पावसाची नोंद झाली असून, यामुळे या मंडळात दुसऱ्यांदा अतिवृष्टीची स्थिती निर्माण झाली. तर उर्वरित सहा मंडळांत ४० ते ५० मिमी पावसाची नोंद झाली. हा एक दिवस वगळता ऑगस्ट महिना बहुतांश कोरडा गेला आहे. आतापर्यंत या महिन्यात तालुक्यात सरासरी केवळ ३८.०५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने तलावांमधील पाणीसाठाही ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे. पावसाने डोळे मिटल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत. ३१ ऑगस्टपर्यंत पावसाने दमदार हजेरी लावली नाही, तर फुलोऱ्यातील सोयाबीनसह खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

