The Kavad Yatra : येथील श्री शिवशंभू प्रतिष्ठान ग्रुपच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी आयोजित या यात्रेत शिवशंभू प्रतिष्ठान ग्रुपचे २४६ सदस्य तसेच महाकाल भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लोणारच्या पवित्र जलासह २४६ महाकाल भक्तांची कावड यात्रा; हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन; कावड यात्रेवर मुस्लिम बांधवांकडून पुष्पवृष्टी
फकीरा पठाण
मलकापूर पांग्रा : येथील श्री शिवशंभू प्रतिष्ठान ग्रुपच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी आयोजित या यात्रेत शिवशंभू प्रतिष्ठान ग्रुपचे २४६ सदस्य तसेच महाकाल भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कावड यात्रेची सुरुवात लोणार सरोवर परिसरातील कमळजा माता मंदिरात दर्शन घेऊन करण्यात आली. तेथून पवित्र जल घेऊन सकाळी सुमारे ७ वाजता यात्रेला प्रारंभ झाला. संपूर्ण मार्गावर ‘हर हर महादेव’ आणि ‘जय महाकाल’च्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते.
यात्रेदरम्यान लोणार, सारस्ती, हट्टा, तांबोळा, चिखला, बीबी आणि मांडवा येथील ग्रामस्थांनी कावड यात्रेतील भाविकांसाठी ठिकठिकाणी चहा, नाश्ता व फराळाची व्यवस्था केली होती. शिवशंभू प्रतिष्ठान ग्रुपचे हे सलग चौथे वर्ष असून मागील चार वर्षांपासून लोणार सरोवर येथूनच या कावड यात्रेला सुरुवात करण्यात येत आहे.
यावेळी शिवशंभू प्रतिष्ठान ग्रुपच्या वतीने निलेश टाले, आकाश गवई, दीपक आकळे, नाकसेन काकडे, हर्षल गवई, नारायण टाले आदींनी आघोरी वेशभूषा परिधान करून यात्रेचे विशेष आकर्षण निर्माण केले.
कावड यात्रेदरम्यान गावातील मुस्लिम बांधवांनीही सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवत यात्रेवर पुष्पवृष्टी केली. यामध्ये तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आरिफ मलिक खान, साबिर पठाण, आसिफ पठाण यांच्यासह मुस्लिम समाजातील अनेक बांधव उपस्थित होते.
सायंकाळी सुमारे ६ वाजता कावड यात्रा मलकापूर पांगरा येथे पोहोचली. यात्रेसोबत आणलेले पवित्र जल ग्रामदैवताला अर्पण करून कावड यात्रेची सांगता करण्यात आली. या यात्रेत गावातील पुरुष, महिला तसेच माता-भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

