Woman delivers baby : येथील ग्रामीण रुग्णालयापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर एका महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाल्याची संतापजनक घटना मंगळवारी सकाळी घडली. प्रसूतीवेदनांनी विव्हळत असलेल्या महिलेला मदत मिळावी म्हणून रुग्णालयातील परिचारिकेकडे विनंती करण्यात आली; मात्र आरोग्य कर्मचारी मदतीसाठी बाहेर आले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. अखेर सामाजिक कार्यकर्त्यांनी खासगी रुग्णालयातील महिला डॉक्टरांना घटनास्थळी आणून महिलेची मदत केली. या घटनेमुळे ग्रामीण रुग्णालयाच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

रुग्णालयाच्या दारातच महिलेची प्रसूती; मदतीसाठी विनवणी करूनही आरोग्य कर्मचाऱ्यांची पाठ
मेहकर : येथील ग्रामीण रुग्णालयापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर एका महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाल्याची संतापजनक घटना मंगळवारी सकाळी घडली. प्रसूतीवेदनांनी विव्हळत असलेल्या महिलेला मदत मिळावी म्हणून रुग्णालयातील परिचारिकेकडे विनंती करण्यात आली; मात्र आरोग्य कर्मचारी मदतीसाठी बाहेर आले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. अखेर सामाजिक कार्यकर्त्यांनी खासगी रुग्णालयातील महिला डॉक्टरांना घटनास्थळी आणून महिलेची मदत केली. या घटनेमुळे ग्रामीण रुग्णालयाच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ही घटना मंगळवारी सकाळी सुमारे ६ वाजता घडली. ग्रामीण रुग्णालयापासून काही अंतरावर एक महिला प्रसूतीवेदनांनी त्रस्त होऊन रस्त्यावरच प्रसूत झाली. वेदनेने ती महिला मोठमोठ्याने ओरडत होती. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते योगेश सौभागे यांनी धाव घेतली. त्यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन उपस्थित परिचारिका श्रीमती जाधव यांना महिलेच्या मदतीसाठी येण्याची विनंती केली. मात्र, रुग्णालयाबाहेर येण्यास त्यांनी नकार दिल्याचा आरोप सौभागे यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी डॉ. आव्हाळे यांच्या खासगी रुग्णालयाशी संपर्क साधून तेथील महिला डॉक्टरांना घटनास्थळी आणले. त्यानंतर महिलेची प्राथमिक उपचाराची व्यवस्था करून तिला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले.
डॉक्टरांच्या अनुपस्थितीचा आरोप
घटनेच्या वेळी ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. रुग्णालयातील डॉक्टरांची अनुपस्थिती, रुग्णांप्रती असलेली कथित अनास्था तसेच कारभारातील अनागोंदीमुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. गंभीर परिस्थितीत रुग्णांना अन्यत्र उपचारासाठी पाठविण्याचे प्रमाणही वाढल्याचा आरोप करण्यात आला आहे.
त्वरित कारवाई करा – संजय रायमुलकर
माजी आमदार संजय रायमुलकर यांनी या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सकांशी संपर्क साधला. त्यांनी घटनेची माहिती देतानाच सीसीटीव्ही फुटेजही पाठविले. शासनाकडून लाखो रुपये वेतन घेऊनही संबंधित डॉक्टर रुग्णालयात नियमित उपस्थित राहत नसल्याचा आरोप करत त्यांनी संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. तसेच रुग्णांना मोठ्या प्रमाणावर बाहेर रेफर करण्याच्या प्रकारालाही आळा घालण्याची मागणी त्यांनी केली.
दरम्यान, या प्रकरणाची दखल घेऊन संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल तसेच रुग्णांना नियमित, उत्तम आणि व्यवस्थित आरोग्यसेवा मिळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येतील, असे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितल्याचे रायमुलकर यांनी स्पष्ट केले.

