TET exam: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारी टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) रविवार, दि. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील १८परीक्षा केंद्रांवर पार पडणार आहे. या परीक्षेसाठी एकूण ११,२८३ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली असून पेपर क्र.१ साठी ५,३०८ आणि पेपर क्र. २ साठी ५,९७५ विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

२३ नाेव्हेंबरला आयाेजन : परीक्षा आयाेजन व संनियत्रण समितीची बैठक
बुलढाणा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारी टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) रविवार, दि. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील १८परीक्षा केंद्रांवर पार पडणार आहे. या परीक्षेसाठी एकूण ११,२८३ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली असून पेपर क्र.१ साठी ५,३०८ आणि पेपर क्र. २ साठी ५,९७५ विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
ही परीक्षा प्राथमिक शिक्षक पदासाठी पात्रता मिळविण्यासाठी अत्यंत महत्त्वाची व संवेदनशील असल्याने ती पारदर्शक, सुरळीत आणि शांततेत पार पाडावी, अशा सूचनाही जिल्हा परीक्षा आयोजन व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिल्या.
४ नोव्हेंबर 2025 रोजी, जिल्हाधिकारी यांच्या दालनात परीक्षा आयोजन व संनियंत्रण समितीची बैठक पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, जिल्हा पोलीस अधिक्षकांचे प्रतिनिधी, प्राचार्य, डायट बुलढाणा, शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक/योजना) तसेच जिल्हा कोषागार अधिकारी यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या केंद्रावर हाेणार परीक्षा
शिवाजी हायस्कूल, एडेड हायस्कूल, शारदा ज्ञानपीठ, भारत विद्यालय, उर्दू हायस्कूल, सहकार विद्यामंदिर-1 व 2, केंब्रिज स्कूल, पोदार इंग्लिश स्कूल, सेंट जोसेफ इंग्लिश स्कूल, प्रबोधन विद्यालय, शाहू इंजिनिअरिंग कॉलेज, पंकज लद्धड इंजिनिअरिंग कॉलेज, गुरुकुल ज्ञानपीठ सागवान, विद्या विकास विद्यालय कोलवड, शिवसाई ज्ञानपीठ सागवान, राजीव गांधी सैनिकी शाळा कोलवड आणि जिजामाता महाविद्यालय येथे परीक्षा होणार आहे.
परीक्षा केंद्रांवर CCTV कॅमेऱ्यांद्वारे देखरेख ठेवली जाणार असून, परीक्षार्थींची सखोल तपासणी करण्यात येईल.परीक्षार्थींनी प्रवेशपत्रासह मूळ ओळखपत्र (आधार, पॅन, वाहन परवाना इ.) अनिवार्यपणे बाळगावे.परीक्षा केंद्रावर हँडहोल्ड डिटेक्टर, बायोमेट्रिक व फेस रिकग्निशन तपासणी होणार असल्याने परीक्षार्थींनी परीक्षा सुरू होण्याच्या दीड तास आधी केंद्रावर उपस्थित राहावे.परीक्षा गृहात मोबाईल, कॅलक्युलेटर, कॅमेरा, डिजिटल घड्याळ नेण्यास सक्त मनाई आहे.सर्व परीक्षार्थींनी नियमांचे काटेकोर पालन करावे, जेणेकरून कोणतेही नुकसान होऊ नये, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विकास पाटील यांनी आवाहन केले आहे.

