Har Har Mahadev: पवित्र श्रावण महिन्यातील श्रावणी सोमवारचे औचित्य साधून आरेगाव रोडवरील प्रसिद्ध श्री ओलांडेश्वर महादेव मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. ओलांडेश्वर मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावणातील चारही सोमवारी भाविकांसाठी महाप्रसादाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने यंदा तब्बल पाच क्विंटल साबुदाणा-केळीच्या उसळीचे वाटप करण्यात आले.

ओलांडेश्वर मंदिरात पाच क्विंटल साबुदाणा-केळी उसळीचा महाप्रसाद; हजारो भाविकांनी घेतला लाभ
डोणगाव : पवित्र श्रावण महिन्यातील श्रावणी सोमवारचे औचित्य साधून आरेगाव रोडवरील प्रसिद्ध श्री ओलांडेश्वर महादेव मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. ओलांडेश्वर मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावणातील चारही सोमवारी भाविकांसाठी महाप्रसादाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने यंदा तब्बल पाच क्विंटल साबुदाणा-केळीच्या उसळीचे वाटप करण्यात आले.
श्रावणी सोमवारी पहाटेपासूनच ओलांडेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ‘हर हर महादेव’ आणि ‘ॐ नमः शिवाय’च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर बाहेर पडणाऱ्या हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
श्रावण महिन्यात अनेक भाविक उपवास करीत असल्याने त्यांची सोय व्हावी, या उद्देशाने ओलांडेश्वर मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महाप्रसादाचे नियोजन केले. भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसादाचे वाटप केले.
ओलांडेश्वर मित्र मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व धार्मिक उपक्रमांत सक्रियपणे सहभागी होत आहे. या उपक्रमासाठी मंडळाचे पदाधिकारी, सदस्य तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. मंडळाच्या या स्तुत्य उपक्रमाचे मंदिराचे विश्वस्त, ग्रामस्थ आणि भाविकांकडून कौतुक करण्यात आले.

