2 lakh 80 thousand stolen : खाली पैसे पडल्याची बतावणी करून एका युवकाचे तब्बल २ लाख ८० हजार रुपये तीन ते चार युवकांनी लंपास केले. ही घटना वाडेगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर १८ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली.या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

राहुल सोनोने
वाडेगाव : खाली पैसे पडल्याची बतावणी करून एका युवकाचे तब्बल २ लाख ८० हजार रुपये तीन ते चार युवकांनी लंपास केले. ही घटना वाडेगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर १८ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली.या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाडेगावातीलच शेख मुद्दसिर शेख असलम कुरेशी यांनी दुपारी साडेतीनच्या सुमारास एसबीआय तसेच शेजारच्या एटीएममधून मिळून ₹2,80,000 काढले. पैसे ठेवलेली पिशवी गाडीवर ठेवून निघण्याच्या तयारीत असताना तोंडाला रुमाल बांधून तीन ते चार युवक त्याच्या जवळ आले आणि “काही पैसे पडलेत” असे सांगितले. त्यावर तो गाडीजवळून खाली उतरला, इतक्यात बाजूलाच उभे असलेल्या दुसऱ्या युवकांनी गाडीवरील पैशांची पिशवी उचलून चटकन् पसार झाले. बँक परिसरात झालेल्या एकच गोंधळात ही घटना क्षणात घडली.
घटनेची माहिती मिळताच वाडेगाव पोलीस चौकीचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक संभाजी हिवाळे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून सविस्तर माहिती घेतली. दरम्यान बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे यांनीही भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. वृत्त लिहेपर्यंत पंचनामा सुरू असल्याची माहिती आहे.
एका महिन्यात वाडेगावात दुसरी चोरी!
गेल्या महिन्यातच पातूर तालुक्यातील तुलंगा येथील बाळू मामनकार यांचे दोन लाख रुपये दुचाकीवरून लंपास झाले होते. त्या घटनेच्या अवघ्या पंधरा दिवसांत पुन्हा दोन लाखांहून अधिक रकमेची चोरी झाल्याने व्यापारी, व्यावसायिक आणि सामान्य नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली आहे.स्थानिकांतून पोलिसांच्या गस्त व्यवस्था आणि बँक परिसरातील सुरक्षा उपायांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

