11 new leprosy patients: राज्यभर राबविण्यात येत असलेल्या कुष्ठरोग शोध मोहिमेअंतर्गत अकोला जिल्ह्यात मागील पाच दिवसांत (17 ते 21 नोव्हेंबर) एकूण 11 नवीन कुष्ठरुग्ण आढळून आले आहेत. जिल्हाधिकारी वर्षा मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, तसेच उपसंचालक डॉ. सुशील कुमार वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू आहे.

राज्यात कुष्ठरोग शोध मोहीम सुरू
अकोला : राज्यभर राबविण्यात येत असलेल्या कुष्ठरोग शोध मोहिमेअंतर्गत अकोला जिल्ह्यात मागील पाच दिवसांत (17 ते 21 नोव्हेंबर) एकूण 11 नवीन कुष्ठरुग्ण आढळून आले आहेत. जिल्हाधिकारी वर्षा मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, तसेच उपसंचालक डॉ. सुशील कुमार वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आरती कुलवाल आणि संचालक डॉ. दिलीप रणमले यांच्या नियोजनानुसार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे.
मोहिमेच्या पहिल्या पाच दिवसांत 559551 नागरिकांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3996 संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. नवीन निदान झालेले 11 रुग्णांवर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले आहेत. यापूर्वी उपचार घेत असलेल्या 139 रुग्णांसह जिल्ह्यात सध्या एकूण 150 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
गाव पातळीवर जागरूकता आणि घराघरातील सर्वेक्षणासाठी 1042 पथके आणि 208 पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत. आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी आणि समुदाय आरोग्य अधिकारी हे सक्रिय सहभाग घेत असून जिल्हास्तरीय अधिकारी सतत भेटी देऊन मोहीम पाहणी करत आहेत.
कुष्ठरोग हा दिसायला साधा वाटला तरी गंभीर आजार असून त्याचे दोन प्रकार —
पी.बी. (एक डाग असलेले) — 6 महिन्यांचा उपचार
एम.बी. (दोन किंवा अधिक डाग असलेले) — 12 महिन्यांचा उपचार
या आजाराचा अदिशयन कालावधी अत्यंत मोठा असून 3 ते 10 वर्षे, तर काहीवेळा 25 वर्षांपर्यंत लक्षणे दिसू शकतात.
कुष्ठरोगाची प्रमुख लक्षणे:
त्वचेवर फिकट किंवा रंग फिका पडलेले डाग
गाठी किंवा उठाव
स्पर्श, गरम-थंड जाणवण्याची संवेदना कमी होणे
स्नायू कमकुवत होणे, हातापायांच्या बोटांमध्ये विकृती
डोळे व श्वसनमार्गावर परिणाम
कुष्ठरोग वेळेत उपचार घेतल्यास पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. लवकर निदान केल्यास अपंगत्व टाळता येते, यावर भर देत जिल्हा प्रशासन, तसेच डॉ. बळीराम गाढवे यांनी नागरिकांना आशा व आरोग्य कर्मचार्यांमार्फत घरी येणाऱ्या तपासणीला सहयोग देण्याचे आवाहन केले आहे.

