mahabreaking.com

Akash Fundkar : कामगारांचे कामाचे तास वाढले, अधिकचा आर्थिक फायदाही हाेणार

Akash Fundkar : कामगारांच्या कामकाजाच्या वेळेबाबत आता दिवसाला ९ तासांऐवजी १२ तास काम करण्याची तरतूद करण्यात आली आहे. कलम 55 मध्ये विश्रांती कालावधीमध्ये बदल करून ५ तासांनंतर ३० मिनिटे आणि ६ तासांनंतर पुन्हा ३० मिनिटे विश्रांतीची तरतूद करण्यात आली आहे. यातील कलम ५६ मध्ये आठवड्याचे कामकाजाचे तास ४८ तासांवरून ६० तासांपर्यंत वाढविण्यात आले आहेत.
Akash Fundkar

मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कारखाने अधिनियम, 1948 मधील काही तरतुदींमध्ये महत्त्वपूर्ण दुरुस्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे कामगार आणि उद्योग क्षेत्रातील नियम सुलभ होऊन पारदर्शकता वाढणार असल्याची माहिती कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिली. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.

या दुरुस्ती अंतर्गत कलम ५४ मध्ये कामगारांच्या कामकाजाच्या वेळेबाबत आता दिवसाला ९ तासांऐवजी १२ तास काम करण्याची तरतूद करण्यात आली आहे. कलम 55 मध्ये विश्रांती कालावधीमध्ये बदल करून ५ तासांनंतर ३० मिनिटे आणि ६ तासांनंतर पुन्हा ३० मिनिटे विश्रांतीची तरतूद करण्यात आली आहे. यातील कलम ५६ मध्ये आठवड्याचे कामकाजाचे तास ४८ तासांवरून ६० तासांपर्यंत वाढविण्यात आले आहेत. तसेच कलम ६५ मध्ये कामगारांच्या अतिरिक्त वेळेबाबत (ओव्हरटाईम) आता कमाल मर्यादा ११५ तासांवरून १४४ तासांपर्यंत वाढविण्यात आली आहे. यामुळे कामगारांना अधिकचा आर्थिक फायदा होणार आहे. तसेच शासन मान्यतेशिवाय असा वेळेतील बदल कारखान्यांना परस्पर करता येणार नाही. त्याचबरोबर, आठवड्यात 48 तास काम ही कालमर्यादा ओलांडता येणार नसल्याचेही मंत्री ॲड.फुंडकर यांनी सांगितले आहे.
कामगार मंत्री ॲड.फुंडकर यांनी सांगितले की, कामगारांनी जास्तीचे काम घेतल्यास त्याचा पुरेपूर मोबदला आणि पगारी सुट्या देण्यासबंधीचे बदल यात सुचविण्यात आले आहेत. केंद्र शासनाच्या ease of doing business च्या धोरणा अंतर्गत देशात होणारे बदल लक्षात घेता कायद्यातील हे बदल उद्योग आणि कामगार या दोन्ही घटकांसाठी महत्वाचे आहेत. या बदलांमुळे उद्योग क्षेत्राला अधिक लवचिकता मिळेल तर कामगारांसाठीही पारदर्शक आणि नियोजित कामकाजाचे वातावरण उपलब्ध होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top