
वाडेगाव : चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळखुटा येथील मन नदीवर शनिवारी (३० ऑगस्ट) पोहण्यासाठी गेलेल्या तिघांपैकी एक युवक बेपत्ता झाला होता. रविवारी (३१ ऑगस्ट) दुपारी शहापूर (ता. खामगाव) येथील मन नदी परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला.
मिळालेल्या माहितीनुसार, करण वानखडे हा युवक शनिवारी नदीत पोहायला गेला असता बुडून बेपत्ता झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी तहसील प्रशासन, पोलीस पथक तसेच बचाव पथकाकडून प्रयत्न सुरू होते. अखेर रविवारी दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास शहापूर परिसरात मन नदीत करण वानखडे याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला.
मृतदेह वंदे मातरम् आपत्कालीन शोध व बचाव पथकाला आढळून आला. या मोहिमेत जिल्हा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे, पथक प्रमुख उमेश आटोटे यांच्यासह सुनील कल्ले, गौतम मोहोड, मनीष मेश्राम, सिद्धार्थ सुरवाडे, विकी उन्हाळे, राजकुमार जामणी, अविनाश गायकवाड, सचिन मोहोड, रामभाऊ दोरकर, धम्मशील मोहोड, नितेश मोहोड, जयकुमार दामोदर, रवींद्र महानकार, परसराम टिकार, गोपाल राखोंडे, कपिल ताले, ओम टाले, अक्षय धोत्रे तसेच वंचित बहुजन आघाडीचे चंद्रकांत तायडे यांनी अथक परिश्रम घेतले.
घटनास्थळी चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र लांडे यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. पुढील तपास सुरू असून मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथे पाठविण्यात आले आहे.
कंझरा येथील महिलेचाही मृतदेह सापडला
मूर्तिजापूर तालुक्यातील कंझरा येथील रहिवासी रेखा रमेश मते या गावाजवळील नाल्यावर असलेल्या रपट्यावरून जात असताना पाय घसरल्याने पुराच्या पाण्यात वाहून गेल्या होत्या. त्यांचा शोध बचाव पथकांकडून सुरू होता. अखेर ३१ ऑगस्ट रोजी त्यांचा मृतदेह पथकाला सापडला. या शोध मोहिमेत दीपक सदाफळे, रणजित घोगरे आणि विजय मालटे यांनी सहकार्य केले.