‘One Village, One Ganpati’ : तालुक्यातील दोन पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील ३२ गावांमध्ये यावर्षी ‘एक गाव, एक गणपती’ या उपक्रमांतर्गत गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये एकोप्याचे आणि समाजकारणाचे दर्शन या उपक्रमातून घडत आहे.
बाळापूर: तालुक्यातील दोन पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील ३२ गावांमध्ये यावर्षी ‘एक गाव, एक गणपती’ या उपक्रमांतर्गत गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये एकोप्याचे आणि समाजकारणाचे दर्शन या उपक्रमातून घडत आहे.
बाळापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १५ गावांत तर उरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १७ गावांत हा उपक्रम राबविण्यात आला. मागील वर्षी ही संख्या ३८ होती, मात्र यावर्षी ती घटून ३२ वर आली आहे. याशिवाय, तालुक्यातील दोन्ही पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण २३६ सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने गणेशोत्सव साजरा केला जात आहे.
दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवामुळे भक्तांत उत्साहाचे वातावरण आहे. शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन पडघण, बाळापूरचे ठाणेदार अनिल जुमळे, तसेच उरळचे ठाणेदार पंकज कांबळे हे दक्षता घेत आहेत. ठिकठिकाणी शांतता समित्यांच्या बैठका घेऊन कायदा-सुव्यवस्था राखण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.गणेश मंडळांच्या वतीने सामाजिक प्रबोधनात्मक, मनोरंजनात्मक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून उत्सवाला सामाजिक दिशा दिली जात आहे.