Nilesh Tambe : हिंदु आणि मुस्लीम बांधवांनी आपआपले सण उत्सव म्हणून साजरे करावेत तसेच हे सण साजरे करताना इतरांना त्रास हाेणार नाही याची काळजी घ्यावी,असे आवाहन जिल्हा पाेलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी केले.

साखरखेर्डा : हिंदु आणि मुस्लीम बांधवांनी आपआपले सण उत्सव म्हणून साजरे करावेत तसेच हे सण साजरे करताना इतरांना त्रास हाेणार नाही याची काळजी घ्यावी,असे आवाहन जिल्हा पाेलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी केले.
साखरखेर्डा येथे सुरू असलेल्या श्रीगणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी ३ सप्टेंबर रोजी रात्री विविध गणेश मंडळांना भेट देऊन मिरवणूक मार्गाची पाहणी केली. सर्वप्रथम त्यांनी श्री पलसिद्ध महास्वामी मठात भेट देऊन समाधी दर्शन घेतले. यावेळी मठाचे दिवानजी विश्वनाथ आप्पा जितकर यांनी मठाविषयी माहिती दिली. त्यानंतर पोलीस ठाण्यात गणेश मंडळाचे पदाधिकारी व ईद मिलाद कमेटीचे सदस्य यांची बैठक घेऊन तांबे यांनी मार्गदर्शन केले.
त्यांनी सांगितले की, “हिंदू व मुस्लिम बांधवांनी आपापले सण उत्साहात साजरे करताना इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. काही समाजकंटक अफवा पसरवून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे प्रत्येक मंडळातील अध्यक्षांनी अशा लोकांवर लक्ष ठेवावे.”
यानंतर त्यांनी १०० वर्षांची परंपरा असलेल्या श्री शिवाजी व्यायाम शाळा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात जाऊन श्री गणेशाची सार्वजनिक आरती केली. मंडळाचे अध्यक्ष अशोक इंगळे यांनी शाल–श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच श्री बालनाथ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन तेथेही दर्शन घेतले. त्यावेळी श्री प्रल्हाद महाराज संस्थानचे उपाध्यक्ष रावसाहेब देशपांडे यांनी त्यांचा गौरव केला.त्यानंतर तांबे यांनी दगडी मशीद, गुजरी चौक, माळीपुरा, गणपती चौक आदी भागांची पाहणी केली. त्यांच्या समवेत उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, ठाणेदार गजानन करेवाड यांच्यासह चार पोलीस अधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमास सरपंचपती अमित जाधव, अंकुर देशपांडे, अर्जुन गवई, संतोष मंडळकर, गजानन इंगळे, राहुल नालिंदे, राजू जैन, देवानंद खंडागळे, शैलेश देशपांडे, शंतनु देशपांडे, गोपाल भिमराव शिराळे, सुरेश राजपूत, माजी सरपंच दाऊद कुरेशी, माजी उपसरपंच सय्यद रफीक, संग्रामसिंह राजपूत, अस्लम अंजुम, आशिष कामे, इब्राहिम शहा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.