Lord Mahavir’s birth anniversary : जैन समाजाच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेत महत्वाचे स्थान असलेल्या पर्युषण पर्वाच्या पाचव्या दिवशी भगवान महावीर जन्मवाचनाचा सोहळा लाेणार शहरात मोठ्या उत्साहात पार पडला. या निमित्ताने रविवारी दुपारी १२.३० वाजता जैन श्वेतांबर मुनीसुव्रत स्वामी मंदिरापासून भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली.
लोणार : जैनसमाजाच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेत महत्वाचे स्थान असलेल्या पर्युषण पर्वाच्या पाचव्या दिवशी भगवान महावीर जन्मवाचनाचा सोहळा लाेणार शहरात मोठ्या उत्साहात पार पडला. या निमित्ताने रविवारी दुपारी १२.३० वाजता जैन श्वेतांबर मुनीसुव्रत स्वामी मंदिरापासून भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली. पर्युषणपर्वात येणाऱ्या भगवान महावीर यांच्या जन्मवाचन प्रसंगाला भक्तिमय वातावरण लाभावे या हेतूने जैन समाजाने सजवलेल्या रथातून भगवान महावीर यांची प्रतिमा शहरातून वाजतगाजत नेण्यात आली. या शोभायात्रेमुळे संपूर्ण परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले.
पारंपरिक वाद्यांचा गजर,धार्मिक घोषणा, फुलांची सजावट व वंदन गीतांमुळे वातावरण भारावून गेले होते.याशोभायात्रेत समाजातील महिला,पुरुष,युवक, बालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. शुभ्र परिधान केलेले वस्त्र, हातातील ध्वज व धार्मिक घोषणांनी शोभायात्रेची शोभा अधिकच वाढवली. समाजातील ज्येष्ठ मंडळींसोबतच चिमुकल्यांनी देखील आकर्षक वेशभूषा करून शोभायात्रेत सहभाग घेतला.याप्रसंगी विशेषतः अक्षय अजितकुमार संचेती यांनी भगवान महावीर यांची प्रतिमा घेऊन सजवलेल्या रथामध्ये विराजमान होण्याचा मान मिळवला, तर रथाचे स्वारथ्य बालक हेतराज संचेती याने केले. संपूर्ण रथाभोवती रंगीबेरंगी फुलांची सजावटमुळे तो लक्षवेधी ठरला. भगवान महावीर यांच्या जीवनातील शांतता,अहिंसा व करुणेचा संदेश शोभायात्रेत देण्यात आले होते.शहरातील प्रमुख मार्गावरून ही शोभायात्रा निघाली असता नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून फुलांच्या वर्षावातून स्वागत केले. शहरातील नागरिकांनी या शोभायात्रेचा मनोभावे आनंद घेतला.या शोभायात्रेचे आयोजन स्थानिक जैनश्वेतांबर समाजतर्फे करण्यात आले होते.
आठ दिवस विविध कार्यक्रम
लोणार येथे जैन समाजाच्या पवित्र पर्युषण पर्व रविवार, २७ ऑगस्ट रोजी संपन्न होणार आहे. गेल्या आठ दिवसांपासून जैन धर्मीयांनी साधना,उपवास, स्वाध्याय व प्रायश्चित्त या माध्यमातून आत्मशुद्धीचा मार्ग स्वीकारला. अहिंसा, सत्य, अपरिग्रह या तत्त्वांचा अंगीकार करत त्यांनी आपले दैनंदिन जीवन संयम व सदाचाराने जगण्याचा संकल्प केला. पर्वाची सांगता झाल्यानंतर २८ ऑगस्ट रोजी सामूहिक क्षमापना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘मिच्छामी दुक्कडम्’ या पवित्र भावनेतून सर्व समाजबांधव एकमेकांची क्षमा मागतील.