Aregaon Road : डोणगाव ते आरेगाव रस्ता चिखलमय व खड्डेमय झाल्यामुळे अनेक दुचाकीस्वारांना अपघातांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने होत होती. सदर रस्ता गेल्या दोन वर्षांपासून खोदून ठेवण्यात आला असून ठेकेदाराने काम अर्धवट सोडल्याने रस्ता अधिकच खराब झाला होता. याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच प्रशासनाने तात्काळ दखल घेतली.
डोणगाव : डोणगाव ते आरेगाव रस्ता चिखलमय व खड्डेमय झाल्यामुळे अनेक दुचाकीस्वारांना अपघातांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने होत होती.
सदर रस्ता गेल्या दोन वर्षांपासून खोदून ठेवण्यात आला असून ठेकेदाराने काम अर्धवट सोडल्याने रस्ता अधिकच खराब झाला होता. याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच प्रशासनाने तात्काळ दखल घेतली.
याच पार्श्वभूमीवर मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विनायक टाले, उभाठ्याचे शिवसेना तालुकाप्रमुख निंबाजी पांडव, पवन टाले तसेच डोणगाव येथील विविध पक्षांचे पदाधिकारी यांनी हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली.
२ सप्टेंबर रोजी आमदार सिद्धार्थ खरात यांनी खड्ड्यांची पाहणी करून उपविभागीय अधिकारी यांच्याकडे काम का बंद आहे याबाबत चौकशी केली. त्यावेळी “सदर रस्त्याकरिता निधी उपलब्ध नसल्यामुळे काम बंद आहे,” असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर आमदारांनी “या रस्त्यावर वाहने कशी चालवायची?” असा प्रश्न उपस्थित केला असता, उपविभागीय अधिकारी यांनी “आठवडाभरात रस्ता वाहतुकीस योग्य करण्यात येईल,” असे आश्वासन दिले.यानंतर त्वरित ४ सप्टेंबर रोजी आरेगाव रस्त्यावर खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले. आमदार सिद्धार्थ खरात यांच्या तत्परतेमुळे खड्डे बुजविले जात असले तरी, तातडीने निधी उपलब्ध करून सदर रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.