Asia Cup Hockey: आशिया चषक हाॅकी स्पर्धेत यजमान भारतीय संघाची दमदार कामगिरी सुरूच आहे. साेमवारी भारतीय संघाने दुबळ्या कझाकिस्तान संघाचा १५-० असा धुव्वा उडविला. भारतीय संघाकडून अभिषेकने सर्वाधिक ४ तर सुखजीत सिंगने ३ गोल नोंदवत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
राजगिर: आशिया चषक हाॅकी स्पर्धेत यजमान भारतीय संघाची दमदार कामगिरी सुरूच आहे. साेमवारी भारतीय संघाने दुबळ्या कझाकिस्तान संघाचा १५-० असा धुव्वा उडविला. भारतीय संघाकडून अभिषेकने सर्वाधिक ४ तर सुखजीत सिंगने ३ गोल नोंदवत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
सलग तिसरा विजय मिळवत भारताने अ गटात सर्वाधिक ९ गुणांसह अव्वल स्थान पटकावले, चीन ४ गुणांसह दुसऱ्या, तर जपानहीं ४ गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिले. गोल सरासरी कमी राहिल्याने जपानचे आव्हान संपुष्टात आले, तर चीनने भारतासाठी सुपर फोर फेरीत आगेकूच केली. कझाकस्तानला स्पर्धेत एकही विजय मिळवता आला नाही. एकतर्फी झालेल्या सामन्यात भारताने कमालीचा दबदबा राखला. संपूर्ण सामन्यात बहुतांशवेळ कझाकस्तानच्या गोलक्षेत्रामध्येच खेळ रंगला. त्यांनी क्वचितच भारतीय गोलक्षेत्रात मुसंडी मारली.
भारताने पहिल्या क्वार्टरमध्ये ३ तर वानंतर दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या
क्वार्टरमध्ये प्रत्येकी ४ गोल नोंदवत कझाकस्तानवर वर्चस्व मिळवले. अभिषेकने पाचव्या, आठव्या, २०व्या आणि ५९व्या मिनिटाला गोल केले. सुखजीतने १५व्या, ३२व्या आणि ३८व्या मिनिटाला गोल केले. त्याचप्रमाणे, जुगराज सिंग (२४, ३१व्या मिनिटाला), हरमनप्रीत सिंग (२६, ४७व्या मिनिटाला) यांनी प्रत्येकी दोन, तर अमित रोहिदास (२९), राजिंदर सिंग (३२), संजय (५४) आणि दिलप्रीत सिंग (५५) यांनीही प्रत्येकी एक गोल करीत भारताच्या विजयात हातभार लावला. दरम्यान, भारताने धमाकेदार विजय मिळवला असला, तरी पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याच्या गमावलेल्या संधी चिंतेची बाब ठरत आहे. भारतीयांनी सामन्यात तब्बल १२ पेनल्टी कॉर्नर मिळवले; मात्र, केवळ ४ पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावता आले. यामुळे भारताला आता पुढील निर्णायक सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करण्यासाठी पेनल्टी कॉर्नरवरील कौशल्यामध्ये मोठी सुधारणा करावी लागणार आहे.