Malkapur Pangra : येथील साई एकता गणेश मंडळ दरवर्षी विविध उपक्रमांचे आयोजन करून गावात जातीय सलोखा व सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडवत असते. विशेष म्हणजे हिंदू-मुस्लिम बांधव या मंडळाच्या उपक्रमात सक्रियपणे सहभागी होतात.
फकीरा पठाण
मलकापूर पांग्रा : येथील साई एकता गणेश मंडळ दरवर्षी विविध उपक्रमांचे आयोजन करून गावात जातीय सलोखा व सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडवत असते. विशेष म्हणजे हिंदू-मुस्लिम बांधव या मंडळाच्या उपक्रमात सक्रियपणे सहभागी होतात.
गेल्या अनेक वर्षांपासून ईद-ए-मिलादुन्नबी आणि गणेशोत्सव एकाच काळात येत असल्याने या मंडळातर्फे विशेष उपक्रम राबवले जातात. ईद-ए-मिलादुन्नबीच्या दिवशी मंडळाकडून मिरवणुकीवर फुलांचा वर्षाव केला जातो, तर गणेश विसर्जनावेळी मुस्लिम बांधव गणपतीवर फुलांचा वर्षाव करून जातीय सलोख्याचे उदाहरण घडवतात.
साई एकता मंडळातर्फे यंदा लालबागचा राजा या स्वरूपाची मूर्ती बसवण्यात आली आहे. मागील पाच दिवसांत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गणेश आरतीत विविध समाजातील लोक सहभागी झाले, तर मुलांसाठी नृत्य, नाटक, भजन व कीर्तन स्पर्धा घेऊन विजेत्या मुलांना बक्षिसे देण्यात आली. विशेष म्हणजे या मंडळात अध्यक्षपदी अनेक वेळा मुस्लिम समाजातील व्यक्तींनीही काम पाहिले असून गेली २२ वर्षे हा उपक्रम गावात एकात्मतेचा संदेश देत आहे.
या कार्याबद्दल मंडळाला २०१९ मध्ये पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गौरवचिन्हाने सन्मानित करण्यात आले आहे. गणेश विसर्जन, मोहर्रम किंवा ईद-ए-मिलादुन्नबी यावेळी पोलिसांसमोर आव्हान निर्माण होत असले तरी गावातील हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र येऊन शांततेचे व सौहार्दाचे वातावरण टिकवतात.
शुक्रवारी महाप्रसादाचे वितरण
दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळाकडून भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महाप्रसाद ५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ६ या वेळेत दिला जाणार असून सर्व भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.