Former Minister Subodh Savji : “शेतकऱ्याने काढलेला पिकविमा मुदत संपताच त्वरित मिळावा, तसेच उशिराने मिळालेल्या विम्याबाबत शेतकऱ्यांच्या खात्यात व्याज जमा झाले पाहिजे,” अशी ठाम मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी केंद्रीय आयुष व आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे केली आहे.
डोणगाव : “शेतकऱ्याने काढलेला पिकविमा मुदत संपताच त्वरित मिळावा, तसेच उशिराने मिळालेल्या विम्याबाबत शेतकऱ्यांच्या खात्यात व्याज जमा झाले पाहिजे,” अशी ठाम मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी केंद्रीय आयुष व आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे केली आहे.
८ सप्टेंबर रोजी सावजी यांनी केंद्रीय मंत्री जाधव यांना पाठवलेल्या पत्रातून बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी नमूद केले की, मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांना पिकविमा मिळवण्यासाठी आंदोलने करावी लागत आहेत, पोलीस केसेस अंगावर घ्याव्या लागतात आणि वारंवार शासन दरबारी खेटे घालावे लागत आहेत. अखेर विमा जाहीर होतो, मात्र त्यामध्ये मोठा विलंब होतो.
सावजी यांनी पत्रात स्पष्ट केले की, “शेतकऱ्यांनी संघर्ष करून पिकविमा मिळवला आहे. केवळ राजकीय नेत्यांच्या भेटींमुळे विमा मिळतो असे सांगणे चुकीचे आहे. शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे वेळेवर मिळाले नाहीत, तर तो अन्यायच ठरतो.”
सरकारी पिकविम्याची रक्कम वेळेवर न मिळाल्यास संबंधित विमा कंपन्यांवर कारवाई करून एफआयआर दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली. “खाजगी विमा कंपन्या मुदत संपताच पैसे देतात, मग शासनामार्फत घेतलेला पिकविमा वेळेवर का मिळत नाही? उशिराने मिळालेल्या रकमेस व्याज मिळाले पाहिजे,” असे सावजी म्हणाले.
शेतकऱ्यांच्या तुलनेत शासनातील अधिकारी-कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक आणि लोकप्रतिनिधींना पगार व निवृत्तीवेतन वेळेवर मिळते, हे वास्तव अधोरेखित करून सावजी यांनी संताप व्यक्त केला.
“आपण स्वतः शेतकरी आहात, असे अभिमानाने सांगता. मग याच अभिमानाने आगामी अधिवेशनात पिकविमा मुदत संपताच वितरित व्हावा, तसेच उशिराने मिळणाऱ्या विम्याचे व्याज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावे, यासाठी ठोस पावले उचलावीत,” अशी अपेक्षा सावजी यांनी आपल्या पत्राद्वारे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे व्यक्त केली.