Survey scam: पातुर तालुक्यातील गावंडगाव, उमरा परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसानीच्या सर्वेक्षणातून वगळण्यात आल्याने खासदार अनुप धोत्रे यांनी नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.
राहुल सोनोने
दिग्रस बू: पातुर तालुक्यातील गावंडगाव, उमरा परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसानीच्या सर्वेक्षणातून वगळण्यात आल्याने खासदार अनुप धोत्रे यांनी नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.
पातूर तालुक्यातील गावंडगाव, उमरा परिसरातील उन्हाळी पिकांचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात न जाता तलाठी व त्यांच्या सहकाऱ्यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्याकडून आर्थिक व्यवहार करून खऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसानीच्या सर्वेक्षणातून वगळण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी तहसीलदारासह खासदार अनुप धोत्रे यांच्याकडे केलेल्या तक्रारीतून केला होता. शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत खासदार अनुप धोत्रे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळणे अपेक्षित असताना संबंधितांनी पंचनामे करण्यासाठी प्रत्यक्षात शेतात न जाता कार्यालयात बसून पंचनामे केल्याने अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे सर्वेक्षणाच्या यादीतून वगळण्यात आली आहे. याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत खासदार अनुप धोत्रे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. यावर जिल्हाधिकाऱ्याकडून काय कारवाई केली जाते ,याकडे गावंडगाव, उमरा वासियांचे लक्ष लागले आहे.
अनेक शेतकऱ्यांना सर्वेक्षणातून वगळले !
गावंडगाव, उमरा परिसरातील पिकांचे नुकसान असतानाही अशा शेतकऱ्यांना सर्वेक्षणातून वगळण्यात आले असून,नुकसान नसलेल्या शेतकऱ्याकडून तलाठ्यांनी दलालामार्फत आर्थिक व्यवहार करून त्यांची नावे सर्वेक्षणात समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे गावंडगाव उमरा, परिसरातील सर्वेक्षणातून वगळण्यात आलेल्या संतप्त शेतकऱ्यांनी संबंधिताकडे वारंवार तक्रारी केली आहे. परंतु अद्यापही दखल घेतली गेली नसल्याने शेतकऱ्यांनी खासदाराकडे धाव घेतली.