बुलढाणा : जिल्ह्यातील वाळू तस्करीवर महसूल प्रशासनाने धडक कारवाई करत दुधा परिसरातून जप्त करण्यात आलेल्या टिप्परवर तब्बल ३ लाख ४४ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. यात महसूल विभागाचा २ लाख ६४ हजार आणि परिवहन विभागाचा ८० हजार असा दुहेरी दंड समाविष्ट असल्याची माहिती २० ऑगस्ट रोजी तहसील प्रशासनाने दिली.

१५ ऑगस्टची कारवाई
१५ ऑगस्टच्या रात्री बुलढाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथक गस्त घालत असताना, दुधा येथील मर्दडी घाटाजवळ जगदंबा मंदिर रोडवर संशयास्पद टिप्पर आढळला. मंडळ अधिकारी गणेश राऊत, रमेश पायघन आणि चालक अशोक देवकर यांनी त्या वाहनाची तपासणी केली असता, ट्रकात विना रॉयल्टी वाळू असल्याचे स्पष्ट झाले.
यापूर्वी ९ ऑगस्ट रोजी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बुलढाणा दौऱ्यात पत्रकारांनी वाळू तस्करीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्र्यांनी महसूल प्रशासनाला “तस्करांवर एमपीडीएअंतर्गत कारवाई करा” अशा कठोर सूचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर झालेल्या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
टिप्पर मालक अमोल विजय सोनुने (रा. दुधा) याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. महसूल विभागाने २.६४ लाख रुपये दंड वसूल केला, तर तहसील प्रशासनाच्या पत्रानुसार परिवहन विभागानेही ८० हजारांचा दंड आकारला आहे.